शाहरुखच्या ‘झीरो’ने पहिल्या दिवशी जमवला इतका गल्ला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ असे मल्टिस्टारर असणारा बिगबजेट आणि बहुप्रतीक्षित असा ‘झीरो’ चित्रपट कालच प्रदर्शित झाला आहे. आजच त्याच्या पहिल्या दिवशीच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20.14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘झीरो’ चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांचा पुरता अपेक्षाभंग केल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवशी जरी ही कमाई केली असली तरी वीकेंडला या सिनेमाची खरी परीक्षा असणार आहे हे मात्र नक्की.
शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा ‘ए-वन’ आहे म्हणूनच शाहरुखच्या चाहत्यांनी रिलीजपूर्वीच म्हणजेच रिव्ह्यू येण्यापूर्वी सिनेमाचं बुकिंग केल्याच पाहायला मिळालं. परिणामी पहिल्याच दिवशी या चित्रपटाने  20.14 कोटींची कमाई केली. वीकेंडला या सिनेमाला उतरती कळा लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचं दिसत आहे. टीकाकारांनी सोशल मीडियावर याला ट्रोल्सही सुरु केल्याचं दिसत आहे.
झीरो हा चार हजार 380 स्क्रीन्सवर प्रदर्शित होऊनही त्याने जमवलेला गल्ला सुमार असल्याचं चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरन आदर्श यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तरन यांनी केवळ दीड स्टार देत पहिल्याच दिवशी आपली नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं. शुक्रवार ते रविवार आणि मंगळवारी आलेली नाताळची सुट्टी यामुळे ‘झीरो’ला लाँग वीकेंड मिळाला आहे. मात्र एकावर दोन ‘झीरो’ अर्थात शंभर कोटींचा गल्ला जमवण्यासाठी या सिनेमाला किती धडपड करावी लागणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
फॅन आणि हॅरीपेक्षा बरा…
शाहरुखच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत ‘झीरो’ टॉप 5 मध्ये असल्याचं दिसत आहे. त्यामुळे नॉन-हॉलिडे शुक्रवार असूनही ‘झीरो’ने बरी कामगिरी केली, असं काही चित्रपट जाणकारांचं मत आहे. दरम्यान शाहरुखच्या ‘झीरो’पेक्षा गेल्या वर्षी आलेल्या ‘फॅन’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमांनी सुमार कामगिरी केली होती. ‘फॅन’ने 19.07 कोटी, तर अनुष्कासोबतच्याच ‘हॅरी..’ने पहिल्या दिवशी 15.25 कोटी जमवले होते. त्यामुळे फॅन आणि हॅरीपेक्षा झीरो बराच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
शाहरुखच्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई
हॅपी न्यू इयर 36.31 कोटी
चेन्नई एक्स्प्रेस 33.12 कोटी
रईस 20.42 कोटी
दिलवाले 20.37 कोटी
झीरो 20.14 कोटी
फॅन 19.07 कोटी
जब हॅरी मेट सेजल 15.25 कोटी
रा.वन 14.73 कोटी
डॉन 2- 14.60 कोटी
जब तक है जान 12.61 कोटी
डिअर जिंदगी 8.62 कोटी
माय नेम इज खान 8.16 कोटी