धारावीकडून मुंबईकरांना ‘ख्रिसमस गिफ्ट’, गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) आजचा ख्रिसमसचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला. आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम एरिया समजला जाणारा धारावी परिसरातून कोरोनाचा समूळ नायनाट झाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या 24 तासात एकही कोरोनाचा (Coronavirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे धारावीकडून मुंबईकरांना ख्रिसमस गिफ्ट मिळाली, अशी जोरदार चर्चा आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात धारावीत पहिल्यांदा आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली होती. एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 3788 वर पोहोचली होती. नंतर पाहाता पाहाता धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला हेता. मात्र धारावी परिसरात गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण आढळला नाही. 2.5 वर्गकिलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमध्ये 6.5 लाखांहून अधिक लोक वास्तव्य करतात. सध्या धारावीत 10 पेक्षाही कमी कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असून ते लवकरच बरे होऊन घरी जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दादरमध्ये गेल्या 24 तासांत 8 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली आहे. दादरमध्ये एकूण रुग्णसंख्या 4750 वर पोहोचली आहे. तर माहिममध्ये आज 6 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. माहिममध्ये एकूण 4561 कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 45 नागरिक ब्रिटनमधून कल्याणमध्ये परतले आहेत. त्यांच्या नावाची यादी राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द केली आहेत. या सर्वांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.