विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादी, काँग्रेसला तीन जागा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अत्यंत चुरशीची झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने विजयश्री खेचून आणला आहे. निवडणुकीत तीन पक्ष एकत्रित आल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला. परंतु, शिवसेनेचा एकमेव उमेदवार पराभवाच्या छायेत आहे, तर राष्ट्रवादी, काँग्रेसला तीन आहेत.

पुणे आणि नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले आहेत. पण महाविकास आघाडीने भाजपचे चक्रव्ह्यूव भेदत हे दोन्ही किल्ले काबीज केले आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे सहापैकी चार निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळाला आहे, तर एका जागेवर निकालाची प्रतीक्षा आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल जिंकले आहेत, तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असून, अद्याप निकाल लागायचा आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, तर नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसच्या अ‍ॅडव्होकेट अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

शिवसेना अमरावतीत चितपट?

पदवीधर-शिक्षक निवडणुकीत सहापैकी शिवसेनेच्या वाट्याला १ जागा आली होती. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेला अपक्ष उमेदवाराने तगडी लढत दिली असून, शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पराभवाच्या छायेत दिसत आहेत. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे आघाडीवर आहेत. निकाल अद्याप लागलेला नाही. काही वेळातच निकाल लागण्याची शक्यता आहे.

भाजपचा जल्लोष

सत्तांतर झाल्यानंतरच्या विधान परिषदेची ही पहिलीच निवडणूक की ज्यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडीत सामना होणार आहे. त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांचा विजय होताच भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. पटेल यांनी ३३२ मते मिळवीत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली.