जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ तारखेपर्यंत होणार बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेने बदली प्रक्रियेस सुरुवात केली आहे. जिल्हास्तरीय समुपदेशनाने करावयाच्या बदल्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. 7 जूनपर्यंत सदर बदल्या करावयाच्या आहेत.

तालुकास्तरावरील बदली ६ व ७ जून रोजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरीय बदल्यांच्या वेळापत्रकानुसार येत्या सोमवारी (३ जून) सकाळी १० वाजता अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षिण विभाग, पाणीपुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बालकल्याण विभाग व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यानंतर ४ जून रोजी सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

जिल्हा परिषदेतील वर्ग ३ आणि वर्ग ४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. १६ ते २५ मे या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने प्रत्यक्ष बदल्या करायच्या होत्या. मात्र, या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यामुळे बदल्या करता आल्या नाहीत. ही परिस्थिती विचारात घेऊन बदली प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या बदल्यांना ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेने बदली प्रक्रियेस सुरुवात केली आहे.