केंद्र सरकारचा Zomato सोबत करार, तुम्ही घरबसल्या मागवू शकता स्ट्रीट फूड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने रस्त्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे बाजार उपलब्ध करुन देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान स्वनिधी योजनेंअंतर्गत रस्त्यांवर खाद्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे बाजार उपलब्ध करुन देण्यासाठी झोमॅटोसोबत करार केला आहे, गुरुवारी झोमॅटोने याबाबत करार केला. यापूर्वी स्विगीशी करार केला होता.

पहिल्या टप्प्यात 6 शहरांच्या 300 खाद्यपदार्थ विक्रेत्यांना झोमॅटोसबोत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये भोपाळ, रायपूर, पटणा, बडोदा, नागपूर आणि लुधियाना या शहरांचा समावेश आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर या योजनेचा 125 शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत सरकारसोबत करार केला आहे. याअंतर्गत झोमॅटो रस्त्यांवर खाद्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांना पॅन कार्ड तयार करण्यापासून एफएसएसएआय नोंदणी, फूड मेन्यू डिजिटाईझ करणं, वेंडर सेफ्टी आणि हायजिनसाठी प्रशिक्षण देणार आहे. तसेच किमती ठरवण्यावर काम केले जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे उत्पन्न घटले आहे. अशातच झोमॅटो आणि स्विगीवर त्यांच्या खाद्य पदार्थाची विक्री झाल्यास त्यांनाही मदत होणार आहे. यामुळे रस्त्यावर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना नवे ग्राहक मिळतील आणि घरबसल्या खाद्यपदार्थांचा स्वाद लोकांना घेता येणार आहे. यातून व्यावसायिकाचा मोठा फायदा होणार आहे.