‘झोमाटो’ महिला कर्मचार्‍यांना देणार मासिक पाळीची ‘रजा’

नवी दिल्ली : खाद्य पदार्थांसंबधी ऑनलाइन सेवा देणारी कंपनी झोमाटोने घोषणा केली आहे की, कंपनी महिला कर्मचार्‍यांना 10 दिवसांची मासिक पाळी रजा देणार आहे. कंपनीने म्हटले की, याचा उद्देश संस्थेत जास्त सर्वसमावेशक कार्य संस्कृती रूजवणे आहे.

झोमाटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी आधिकारी (सीईओ) दीपिंदर गोयल यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, झोमाटोमध्ये आम्हाला विश्वास, सत्य आणि स्वीकृतीच्या संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचे आहे. आजपासून, झोमाटोमध्ये सर्व महिला (ट्रान्सजेंडर लोकांसह) एका वर्षात 10 दिवसांपर्यंत मासिक पाळी रजा घेऊ शकतात.

ते म्हणाले, या रजेसाठी अर्ज करण्यात कोणतीही लाज किंवा कोणतीही अस्पष्टता मनात असू नये. पुरूष कर्मचार्‍यांना सुद्धा सल्ला देण्यात आला आहे की, कोणत्याही महिला कर्मचार्‍याला ही रजा घेताना अस्वस्थपणा, अवघडलेपणा जाणवणार नाही, याची काळजी घ्यायची आहे.