Zomato ला करायचीय दारूची ऑनलाईन Home ‘डिलिव्हरी’, ISWAI समोर मांडला प्रस्ताव : अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोलाही देशात दारूची डिलिव्हरी करायची आहे. झोमॅटोने यासाठी इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला (ISWAI) एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये झोमॅटोने दारूची ऑनलाइन डिलिव्हरी देण्याची मागणी केली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे देशभरात लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या दारूच्या मोठ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर झोमॅटोला या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे.

लॉकडाऊनमुळे झोमॅटोच्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसायाला बरेच नुकसान झाले आहे. याच कारणास्तव त्यांनी किराणा मालाची ऑनलाईन डिलिव्हरी सुरू केली आहे आणि आता त्यांना दारूची ऑनलाईन डिलिव्हरी करायची आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, झोमॅटोने पत्रात ISWAI ला ऑनलाईन डिलिव्हरी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

दारूच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी
भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यादरम्यान देशात दारूची दुकानेही बंद होती, परंतु ४ मार्चपासून लागू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारकडून सवलत दिल्यानंतर राज्यांनी दारूची दुकाने उघडण्याचे आदेश दिले होते. दारूची दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली आणि अनेक ठिकाणी शारिरीक अंतर कायद्याचे उल्लंघनही झाले.

भारतात आता नाहीये ऑनलाईन डिलिव्हरीचा नियम
भारतात सध्या दारूच्या ऑनलाईन डिलिव्हरीसाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. एका वृत्तसंस्थेनुसार, आता इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडिया झोमॅटो व इतरांना दारूच्या ऑनलाईन डिलिव्हरीला मंजूरी देण्यासाठी लॉबी करत आहे. या मंजुरीसाठी ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्याही सतत प्रयत्न करत आहेत. झोमॅटोचे सीईओ (फूड डिलिव्हरी) मोहित गुप्ता यांनी ISWAI ला दिलेल्या व्यवसाय प्रस्तावात लिहिले आहे की, “आमचा विश्वास आहे की, तंत्रज्ञानाशी जोडलेल्या होम डिलिव्हरी आधारित सोल्युशनमुळे दारूचा खप वाढवू शकतो.” एका वृत्तसंस्थेनुसार, गुप्ता यांनी लिहिले की झोमॅटो कोरोनाने कमी प्रभावित असलेल्या क्षेत्रांना लक्ष्य करेल.