‘महाविकास’चा फायदा काँग्रेस – शिवसेनेलाच, राष्ट्रवादीला ‘फटका’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महानाट्य पाहायला मिळालं. महायुतीतून एकत्र निवडणूक लढविणारे शिवसेना – भाजपा निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन वेगळे झाले. ५० -५० फॉर्मुल्यानूसार अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेना अडून बसली आणि भाजपने यावर सहमती न दर्शविल्याने २५ वर्षाची हि युती तुटली. याचा फायदा काँग्रेस – राष्ट्रवादीला झाला. त्यांनतर राज्यात वेगळे समीकरण तयार होऊन शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत काँग्रेस – राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेतले. आणि यामुळे सर्वात जास्त जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. या संपूर्ण सत्ता नाट्यांनंतर आता राज्यात झालेल्या ६ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होतं.

महाविकास आघाडीचे पडसाद यावेळी स्थानिक निवडणुकीतही दिसून आले. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या नागपूर जिल्हात परिषदेत काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसला. राज्यात झालेल्या ६ जिल्हा परिषदेच्या निकालाची आकडेवारीनुसार एकूण ३३२ जागांपैकी भाजपाला १०६, काँग्रेसला ७०, राष्ट्रवादीला ४६ तर शिवसेनेला ४९ जागा मिळाल्या आहेत. तर पंचायत समितीच्या एकूण ६६४ जागांपैकी भाजपा १९४, काँग्रेस १४५, शिवसेना ११७ , तर राष्ट्रवादी काँग्रेस ८०, जागांवर विजयी झाली.

दरम्यान, या स्थानिक निवडणुकीच्या निकाल पाहता राज्यात महाविकास आघाडीचा काँग्रेस – शिवसेनेला अधिक फायदा झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत सध्यातरी शिवसेना – काँग्रेस या दोन पक्षांना याचा फायदा होताना दिसत आहे. वाशिममध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक १२ जागा मिळाल्या ज्या गेल्यावेळी ८ जागा होत्या. तर पालघरमध्येही राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची असणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/