फडणवीसांसह गडकरींना मोठा धक्का ! विधानसभेतील ‘ती’ चूक भोवली, नागपूर जि.प. काँग्रेसच्या ताब्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणानंतर याचे परिणाम स्थानिक निवडणुकांमध्ये पहायला मिळत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून धक्कादायक निकाल आले आहेत. माजी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या होमग्राऊंडवर भाजपला रोखण्यात काँग्रेसला यश आले आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला 30, राष्ट्रवादीला 10, भाजपला 15, अपक्ष 1, शेकापला 1 जागेवर यश आले. नागपूर जिल्हा परिषदेवर यापूर्वी भाजपचे वर्चस्व होते. जिल्ह्यात 58 जिल्हा परिषद जागांसाठी 270 उमेदवार व पंचायत समितीच्या 116 गणांसाठी 497 उमेदवार रिंगणात उतरले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या मैदानावर या निवडणुका होत असल्याने सर्वाचे लक्ष याकडे लागले होते.

नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूकीत भाजपला मात देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली होती. आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपसाठी प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक कोण जिंकणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. आज जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला आपल्या होम ग्राऊंडवर पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भाजपच्या हातातील सत्ता काँग्रेसने आपल्या ‘हातात’ घेतली.

निकालानंतर सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर असलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. मात्र, आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्ह्यात भाजपचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का पत्कारावा लागला. नागपूरच्या जनतेने भाजपवर असलेली नाराजी व्यक्त केली आहे. याची दखल महाराष्ट्र घेईल असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

बावनकुळेचे तिकीट नाकारल्याचे परिणाम
विधानसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांचे तिकीट कापले होते. बावनकुळेंचे तिकीट कापल्याने भाजपला मोठा फटका बसला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे.

आजी-माजी मंत्र्यांचे सुपुत्र विजयी
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांच्या मुलांनी विजय मिळवला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी कटोल तालुक्यातील मंटपांजरा सर्कलमधून विजयी मिळवला. तर माजी मंत्री रमेश बंग यांचे चिरंजीव दिनेश बंग हे हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कलमधून विजयी झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/