कोथळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांकडून आठवडी बाजाराचे आयोजन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथळे (ता. पुरंदर) येथील आठवडे बाजाराचे औचित्य साधून अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी बाजाराचे खरेदीबरोबर खाऊ गल्लीतील पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथळेच्या प्रांगणातच या आठवडी बाजाराचे आयोजन केले होते. मुलांना शैक्षणिक गुणवत्तेत बरोबर व्यवहाराचे ज्ञान, चालू घडामोडी बाबत माहिती होण्याच्या उद्देशाने या आठवडे बाजाराचे आयोजन होते. मुलांनी आपल्या शेतातील ताज्या पालेभाज्या मेथी, चाकवत, शेपू , अंबाडी, आंबट चुका, पालक कोथिंबीर त्याचबरोबर ताज्या फळे भाज्या वांगी, बटाटे, कांदे, दोडका, भोपळा, इत्यादी बाजारात विकण्यासाठी आणले होते, विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्या बरोबर घेऊन मुलांना खरेदी विक्रीसाठी मदत करून व्यवहार यांची सांगड घालताना दिसले.

शहरात किंवा गावात प्रत्यक्ष बाजार भरताना कोण कोणत्या गोष्टीमुळे बाजारात अडथळे येतात याचा विचार करून शाळेचे आठवडे बाजारात “वाहनतळ” त्याचबरोबर “मोबाईल खिसेकापू पासून सावध रहा” त्याचबरोबर “प्लास्टिकचा वापर करू नका”, “सुका कचरा ओला कचरा वेगळा करून टाका” असे फलक ठिक ठिकाणी दिसत होते.

या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बाजारात खाऊ गल्ली हा एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला होता. त्याला “कोथळे कट्टा” असे नामकरण केले होते. यामध्ये पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी इडली सांबर, वडापाव, सामोसे, प्याटिस, भजी बरोबर शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू, भाजलेले शेंगदाणे फुटाणे, पाणीपुरी इत्यादी विकण्यासाठी आणले होते. बाजारासाठी उपस्थित असलेल्या अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी या खाऊ गल्लीत जाऊन या पदार्थांचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वंदनाताई जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद जगताप, कोथळे गावचे पोलीस पाटील आबा भंडलकर, ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप वाल्मीक जगताप, सामाजिक कार्यकर्ते दत्ताआबा भोईटे, सुखदेव भंडलकर, धालेवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख उज्वला नाझरेकर, विद्या मंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक दरेकर सर पुढारीचे पत्रकार नितीन राऊत, चव्हाण सर पवार सर, भोसले सर, त्याचबरोबर भोसलेवाडी शाळेचे मुख्याध्यापक विजय गायकवाड, श्रीकांत मेमाने आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोविंद लाखे, सहकारी शिक्षक विकास भोसले, शिक्षिका शारदा चव्हाण, यांनी केले होते.