Virafin : कोरोनावर गुणकारी नव औषध, Zydus cadila ला मंजुरी, एका डोसची किंमत 11,995 रुपये

अहमदाबादः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. अशात कोरोनाविरुध्दच्या लढाईत गुणकारी ठरलेल्या झायडस कॅडिलाचे विराफिन या औषधास रुग्णांवर आपात्कालीन वापरास औषधी नियामक डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता कंपनीने या औषधाची किंमत जारी केली आहे. विराफिनच्या एका डोसची किंमत 11,995 रुपये असून या औषधामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, कंपनीने हे औषध पाठवण्यास सुरुवात केली आहे. या औषधामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी भासेल असा दावा कंपनीने केला आहे. झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी. झायडस कॅडिलाचे इंटरफेरॉन अल्फा – 2 बी म्हणजे Virafin हे अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखले जाते. हिपेटायटिस सी साठी Virafin हे औषध तयार केले होते. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी घेतली आहे. चाचणीत ज्या रुग्णांना औषध दिले होते, त्यापैकी 91.15% रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी 7 दिवसांतच निगेटिव्ह आल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली होती. त्यानुसार डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे. मध्यम स्वरूपाची लक्षण असलेल्या रुग्णांना हे औषध दिले जाणार आहे.