आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी अरबाज खान गोत्यात  

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान आता एका वेगळ्याच प्रकरणामुळे गोत्यात आला आहे. अरबाज खानला आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने समन्स बजावल्याचे वृत्त आहे. सट्टेबाजीत माहीर असलेल्या सोनू जलान यांच्याशी अरबाज खान याचे संबंध असल्याची माहिती पोलिसांकडून कळाली आहे.

अरबाजने एका मोठ्या सट्टेबाजी करणाऱ्या व्यक्तीला पैसे देत मोठा डाव खेळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१२ साली जेव्हा सट्टेबाजीबाबत कारवाई करण्यात आली होती, तेव्हा सोनू जलान उर्फ सोनू मालाडलाही पोलिसांनी पकडले होते. शुक्रवारी ठाण्याच्या क्राईम ब्रांचने अराबाजला समन्स धाडले असून त्याला पोलिसांपुढे शनिवारी (दि.२ जुन) हजर व्हावे लागणार आहे. आता या प्रकरणामुळे अरबाज खान चांगलाच गोत्यात येणार असे दिसते आहे.