Cyclone Tauktae : राज्यात चक्रीवादळाचे 5 बळी ! अद्याप धोका टळलेला नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात तौक्ते चक्रीवादळाने दाणादाण उडवली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात तीन तर जळगावात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अद्याप मुंबईत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला जबरदस्त तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबईकर हादरुन गेले आहेत. पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर आणि भेंडखोल येथे समुद्र उधणलेला आणि जोरदार वारे वाहत आहेत. तसेच रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदूर्ग पेक्षाही भयानक स्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे रायगडमधील नागरीक भीतीच्या छायेखाली असून मागच्या निसर्ग वादळाच्या आठवणी ताज्या असतानाच तोक्ते हे चक्रीवादळ येऊन धडकले आहे. समुद्रालगत असलेल्या पश्चिम उपनगरांना पाऊस आणि वाऱ्याने झोडपून काढले असून तीन तासात 100 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.