Pune SPPU Crime | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण, अद्याप गुन्हा दाखल नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune SPPU Crime | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून Savitribai Phule Pune University (SPPU) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वसतिगृहात राहात असलेला तरूण त्याच्या मैत्रिणीसोबत जात असताना एका धर्मांध टोळक्याने विद्यापीठाच्या आवारात येऊन तरूणाला, तू लव्ह जिहाद (Love Jihad) करतो का, असे म्हणत दमदाटी केली. तसेच मुलीला बाजूला नेऊन तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरूणाला मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे सदर मुलाने वसतिगृह व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

सदर तरुणाने विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार दिली आहे. या प्रकारीवर वसतिगृह प्रमुखांनी कोणती कार्यवाही केली हे अद्याप समजलेले नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित तरुण हा विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी असून तो आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपहारगृहातून बाहेर पडले असता दुचाकीवरुन आलेल्या १० ते १२ जणांनी या विद्यार्थाला अडवले.

या धर्मांध टोळक्याने आम्ही एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत, असे म्हणत विद्यार्थी आणि त्याच्या मैत्रिणीकडे आधारकार्डची मागणी केली. तसेच दोघांच्या धर्माबाबत विचारणा केली. त्यानंतर तू लव्ह जिहाद करतो का ? असे म्हणत विद्यार्थ्याला दमदाटी केली. नंतर या टोळक्याने तरुणीला बाजूला नेऊन लव्ह जिहादबाबत तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर टोळक्यातील लोकांनी तरुणाला धमकावून त्याच्या कुटुंबीयांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
तुमच्या मुलाला घेऊन जा, अशी धमकी टोळक्याने तरूणाच्या वडिलांना दिली.

याबाबत वसतिगृह प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीत तरूणाने आरोप केला आहे की, टोळक्याने मला बेदम मारहाण केली.
मला धमकावून वसतिगृहावर नेले. कपडे भरून निघून जा.
परत येथे दिसता कामा नये, अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : मनि लाँड्रींग प्रकरणात अटक वॉरंट निघाल्याचे सांगून 40 लाखांची फसवणूक