अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंजाबी फिल्म इंडस्ट्री आज (बुधवार) आणखी एका धक्क्याने हादरुन गेली. सतिश कौल यांच्या निधनानंतर पंजबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे आज निधन झाले. सुखजिंदर यांनी युगांडामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे असिस्टंट जगदेव सिंह यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सुखजिंदर शेरा 17 एप्रिल रोजी आपल्या एका मित्राला भेटायला दक्षिण आफ्रिकेतील केनियाला गेले होते. 25 एप्रिल रोजी त्यांना ताप आला आणि त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे निदान झाले. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सुखजिंदर यांनी अनेक लोकप्रिय पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. यारी जट्ट दी, जट्ट ते जमीन या चित्रपटात ते झळकले होते. सध्या ते यार बेली या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते. शेरा हे लुधियानामधील जगरावमधील मलकपूर येथील रहिवासी होते. त्यांचे पार्थिव शरीर भारतात आणण्यासाठी नातेवाईक केंद्र सरकारशी संपर्क साधत आहेत त्यांचे अंत्यविधी पंजाबमध्ये व्हावे, अशी शेरा यांच्या कुटुंबाची इच्छा आहे. मात्र, कोविड-19 मुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान मागील महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले होते. त्यांनी पंजाबी सिनेमांमध्ये 300 हून अधिक चित्रपटात काम केले होते. मागील अनेक दिवसांपासून ते आर्थिक संकटाचा सामना करत होते. यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. सतीश यांनी लोकप्रिय टीव्ही मालिका महाभारतमध्ये इंद्रदेवाची भूमिका साकारली होती.