Yaas बनले धोकादायक, अनेक रेल्वेगाड्या रद्द; 5 राज्यांत NDRF च्या 115 टीम तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Yaas चक्रीवादळ आता धोकादायक बनत आहे. बुधवारी हे वादळ ओडिशामध्ये धडकले. यादरम्यान ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही हवामान खात्याच्या क्षेत्रीय कार्यालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Yaas वरून NDRF नेही तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार, पाच राज्यांत NDRF ची 115 पेक्षा जास्त पथके तैनात आहेत. याशिवाय 20 पथके राखीव ठेवण्यात आले आहे. सायक्लोनच्या प्रत्येक घडामोडीची माहिती घेण्यासाठी NDRF ने विशेष कंट्रोल रुमही तयार केला आहे. ज्यामध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार, रणनीती आखली जाणार आहे. NDRF चे डायरेक्टर जनरल एस. एन. प्रधान यांनी सांगितले की, NDRF ने जी टीम तैनात केली आहे त्यामध्ये ओडिशा 52 तर 45 पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आली आहे.

अनेक रेल्वेगाड्या रद्द
नॉर्थइस्ट फ्रंटियर रेल्वेने सांगितले की, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 24 मे पासून ते 29 मे पर्यंत 38 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. पण ज्या प्रवाशांनी यापूर्वी तिकीट काढले होते, अशा रेल्वे प्रवाशांचे तिकिटाचे पैसे रिफंड करणार आहे. यामध्ये कोलकाता आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.