अमळनेर नगराध्यक्षासह २२ नगरसेवक अपात्र

अमळनेर : जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या निःस्पृह न्यायदानाचा प्रत्यय आज धडाकेबाज निर्णयाने दिला. अमळनेर येथे अतिक्रमण हटाव मोहिम थांबवून त्यांना संरक्षण देण्याचा पालिका सभेत ठराव करणाऱ्या नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांच्यासह २२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निवाडा आज त्यांनी एका प्रकरणात दिला. पुष्पलता पाटील व इतर नगरसेवक नुकतेच भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत. सत्ताधारी पक्षांशी संबंधित नगरध्यक्ष व नगरसेवकरांवर कायद्याचा बगडा उचलण्याचे हे धाडस खरेच राजे निंबाळकर या नावाप्रमाणे आहे. अमळनेर शहरात पालिका मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांनी अतिक्रमण हटावची धडक मोहिम सुरू करुन अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसा दिल्या होत्या. ही कारवाई रोखण्याचा ठराव पालिका सभेत केला होता. त्याच्या विरोध पदाधिकाऱ्यांनी तातडीने विशेष सभा घेवून अतिक्रमण हटाव कारवाई रोखण्याचा ठराव केला होता. हे प्रकरण  जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणीसाठी आल्यानंतर त्यांनी सर्व तथ्ये तपासून अतिक्रमणास अडथळे आणणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरविणाऱ्या कलमाचा वापर करुन नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र ठरविणारा निवाडा केला.