एटीएममधून पैसे काढणे महागणार

वारंवार एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. कारण दुस-या बॅंकांच्या एटीएममधून पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास वीस रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. सध्या यासाठी ग्राहकांकडून 15 रुपये शुल्क आकारले जात असून त्यात पाच रुपयांची वाढ होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने एटीएम व्यवहाराचे नियम कडक केल्याने एटीएम ऑपरेटर्सनी व्यव्हाराचे शुल्क वाढविण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर महागाई वाढल्याने होणारा खर्च वसूल करता यावा म्हणून पाच रुपये वाढविण्याची मागणी ऑपरेटर्सनी केली आहे. रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या निकषांची अंबलबजावणी करायची झाल्यास एटीएम व्यवस्थापनासाठी येणारा खर्च वाढणार आहे. असे सीएटीएमआयचे संचालक के. श्रीनिवास यांनी सांगितले.

रोकड व्यवस्थापनासाठी रिझर्व्ह बँकेने नवी नियमावली तयार केली आहे. या नियमांची अंमलबजावणी जुलैपासून केली जाणार आहे. या नियमांची अंमलबजावणी करताना खर्च वाढेल, असा सूर एटीएम ऑपरेटर्सनी लावला आहे. देशात 19 कंपन्या एटीएम कॅश मॅनेजमेंटचे काम पाहत आहेत. हा सर्व भार या कंपन्यावर पडतो. या कंपन्या तो भार बँकांकडून वसूल करतात. परिणामी बँका त्या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकतात.