एमआयटी या संस्थेला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचाराच्या राज्यामध्ये १० व १२ वीच्या परिक्षांमध्ये वाढत चाललेल्या ‘मास काँपी’च्या प्रकारावरती अंकुश ठेवण्यासाठी, उच्च माध्यमिक बोर्डाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने आणि नियमानुसार मोकळ्या वातावरणात परिक्षा पार पाडण्याचा ज्या नामवंत चांगल्या संस्था प्रयत्न करीत आहेत, त्यांना वेठीस धरून,  त्यांची नाहक बदनामी करणे अत्यंत खेदजनक आहे, असे एमआयटी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये १० तसेच १२ वीच्या परीक्षा चालू आहेत. या परिक्षा वेगवेगळ्या केंद्रावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देखरेखीखाली चालू आहेत. यंदाचे वर्षी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विनंतीवरून लोणी काळभोर येथील एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीचे वाणिज्य शाखेचे नवीन परीक्षा केंद्र चालू करण्यात आले.

एमआयटी महाविद्यालयाच्या या परिक्षा केंद्रावर सुमारे २६० विद्यार्थ्यांमध्ये ९० विद्यार्थिनी परिक्षा देत आहेत. या परिक्षा केंद्रावर उच्च माध्यमिक केंद्राच्या नियमांचे काटेकोर पालन करून, त्यांच्या देखरेखीखाली परीक्षा घेतल्या जात आहेत. असे असताना देखील सदरील विद्यार्थिनीने तिला कॉपी न करू दिल्यामुळे, त्याचा राग मनात धरून, विद्यार्थिनीने व तिच्या पालकांनी खोट्या व विपर्यस्त तक्रारी देऊन, संस्थेला नाहक बदनाम करण्याचे सत्र चालविले आहे.

विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये या करिता सर्वच परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांकरिता पुरुष कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या तपासणीकरिता त्या त्या संस्थांच्या महिला कर्मचारी, माध्यमिक शिक्षण मंडळाने नेमलेल्या होमगार्ड विभागाच्या महिला कर्मचारी उपस्थित असतात. परिक्षा सुरू होण्याच्या अगोदर १५ मिनीटात या सर्व विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या नियमानुसार तपासणी करून, त्यांना परिक्षा हॉलमध्ये सोडले जाते. या नियमांनुसारच, एमआयटीच्या लोणी काळभोर येथील परिक्षा केंद्रावरही सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. कुठल्याही प्रकारे विद्यार्थिनींची विवस्त्र करून संस्थेच्या महिला कर्मचार्‍यांनी तपासणी केलेली नाही. सदरील विद्यार्थिनीने संस्थेवर व संस्थेच्या कर्मचार्‍यांवर जो आरोप केला आहे, तो धादांत खोटा, काल्पनिक व विपर्यस्त स्वरूपाचा आहे.

दि. २१ फेब्रुवारी २०१८ पासून माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने विविध केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांच्या कॉप्या जप्त केलेल्या आहेत. एमआयटीच्या लोणी काळभोर येथील परिक्षा केंद्रावर बसणार्‍या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी, पाल्यांना कॉपी करू न दिल्यामुळे, संस्थेच्या प्राचार्य व इतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. याची सविस्तर तक्रार संस्थेच्या प्राचार्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे केलेली आहे.

बोर्डाच्या नियमानुसार केंद्राच्या आवारात प्रवेश करण्यास बंदी असताना देखील काही पालकांनी सुरक्षा रक्षकांना खोटे बोलून, दमदाटी करून प्रांगणात प्रवेश करून प्राचार्य व कर्मचार्‍यांना जातिवाचक शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी व दमदाटी केली. या सर्व गैरप्रकाराबाबत  एमआयटी कनिष्ठ महाविद्यालय, लोणी काळभोरच्या प्राचार्य व इतर कर्मचार्‍यांनी रितसर तक्रार लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे.

या सर्व खोट्या आरोपांमुळे, परिक्षा केंद्रांवर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि संस्थेचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे आणि संस्थेची काहीही कारण नसताना नाहक बदनामी केली जात आहे.