एमपीएससी निवड प्रक्रियेवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाकडून एक मार्च पर्यंत कायम

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
आरक्षित कोट्यातील उमेदवारांना खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्यास त्यांना अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप करत अजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून याप्रकरणी MPSC निवड प्रकियेवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने एक मार्चपर्यंत कायम ठेवली आहे.  एक मार्चला उच्च न्यायालय या संदर्भातील अंतिम सुनावणी घेऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी सुरु असून,अंतिम सुनावणीसाठी राज्याचे महाधिवक्ता अॅड. आशुतोष कुंभकोणी राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडतील, अशी माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली.

मागासवर्गीय गटासाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून विद्यार्थ्याने गुणवत्तेच्या आधारावर महिला खुला वर्ग अथवा खुला वर्ग स्पोर्ट्स कोट्यातून अर्ज दाखल केला असेल, तर त्याल्या प्रवेश प्रक्रियेच्या एखाद्या टप्प्यावर खुल्या वर्गातून अर्ज केल्याच्या कारणावरुन अपात्र ठरवण्यात येत असल्याची बाब या याचिकेतून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.