कलाकार एेवजी माणूस म्हणून जगण्यात अधिक रस: नागराज मंजुळे

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

“मला कलाकार म्हणून जगण्याएेवजी माणूस म्हणून जगण्यात अधिक रस आहे. जात, धर्म याहीपलीकडे सर्वात अगोदर आपण माणूस आहोत. जमेल तसे कोणतीही कला घेऊन आपण आपले काम करावे. लोकांनी काय घ्यायचे हे त्यांनी ठरवावे”, असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘झिवा स्टुडियो स्पेस’ च्या उद्घाटनप्रसंगी केले. मंजुळे यांच्या हस्ते झिवाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहितदादा पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व पुणे मनपाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक हे उपस्थित होते.

विश्रांतवाडी, पुणे येथे झिवा स्टुडियो स्पेस ही एक अनोखी जागा सर्व कलाकारांसाठी तयार करण्यात आली असून त्यात प्रदर्शने, प्रात्यक्षिके, सिनेमा प्रदर्शन, इव्हेंट्स, कवी संमेलन, कथा वाचन, फोटो शूट इत्यादी गोष्टींसाठी खुली असणार आहे, असे झिवाचे क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रज्ञेश मोळक यांनी सांगितले. मोळक यांनी स्टुडियो स्पेस कलाकारांसाठी एक हक्काची जागा असल्याचे ही सांगितले. विविध कलागुणांना वाव येथे दिला जाईल. या प्रसंगी रोहितदादा पवार यांच्या हस्ते झिवाच्या वेबसाईटचे उद्घाटन झाले. ‘राजकारणापलीकडे जाऊन कलाकारांच्या कलागुणांना वाव देता आला तर नक्कीच देऊ. तरुणाईमध्ये फार कल्पकता आहे. गावाखेड्याचे तरुणसुद्धा यात कमी नाहीत आणि झिवा नक्कीच अशा लोकांच्या कहाण्या पुढे आणेल असा विश्वास वाटतो. पारंपरिकता जपून आपण मॉर्डन गोष्टी आत्मसात करून त्यांची सांगड घातली पाहिजे,’ असे ते पवार म्हणाले. प्रविण गायकवाड यांनी जेंबे हे आफ्रिकन वाद्य वाजून उपस्थितांची मने जिंकली. ‘दुर्दैवाने भारतात कलेची जान कमी लोकांना आहे. कला आणि व्यावहारिकता ही कलाकाराला समजली तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. कलाकारांचे समाजाप्रती योगदान हे मोठेच असते. धावपळीत आपण जगणं विसरून चाललोय की काय? आपण कला जोपासत Passion म्हणून आपण जगलो पाहिजे’, असे गायकवाड म्हणाले. ज्ञानेश्वर मोळक यांनी रवींद्रनाथ टागोर यांचा आदर्श आपण सर्वांनी घेऊन कला क्षेत्रात जे काही करता येईल ते करून नवीन पद्धतीने जगासमोर आणावे असे सांगितले.

झिवाच्या उद्घाटनप्रसंगी विविध कलागुण दर्शवणारे कार्यक्रम सुमित देशमुख, ईशा कारभारी, नकुल सांगेकर, मेघाल खरात, रोहित पवार व पूर्वल खरात यांनी केले. प्रज्ञेश मोळक यांनी नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखत घेतली. ‘माझ्या आयुष्यात काहीच ठरवून घडत नाहीये. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट केला. मला कथा सांगायच्या होत्या. जमेल तशा मी सांगत गेलो. लोकांना त्या आवडल्या की नाही माहित नाही पण मला कथा सांगायला आवडतात आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून मी दाखवतो. सध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत सिनेमा करत असून अजून २-३ सिनेमे डोक्यात आहेत’, असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, ‘नव्या उमेदीचे तरुण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात हे बघून आनंद होतो. झिवा स्टुडियो स्पेस हे असेच एक आहे जिथे वेगळं काहीतरी नक्कीच निर्माण होत राहील.’ नागराज मंजुळे यांनी त्यांच्या काही कविताही सदर केल्या आणि लोकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञेश मोळक यांनी केले तर स्वप्नील चौधरी यांनी अतिशय सध्या परंतु वेगळ्या शैलीत सूत्रसंचालन केले.