कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर तपास यंत्रणेवर सरकारचा दबाव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

शिल्पा माजगावकर

कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात सरकार तापस यंत्रणांवर दबाव टाकत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.२०) कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी सीबीआयला सापडत नसल्याचं सीबीआयच्या वतीने कोर्टात सांगण्यात आल. यावरून न्यायालयाने तपास यंत्रणेला चांगलेच फटकारले आहे. विचारवंतांच्या हत्येच्या तपासाबाबत तापस यंत्रणांची भूमिका संशयास्पद असून तपासात सरकार दबाव टाकत आहे. याचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

टाऊन हॉल पासून या मोर्चाची सुरवात झाली. मोर्चामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात लाल झेंडे आणि सरकारच्या विरोधातील फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विचारवंतांच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पकडून सूत्रधार असणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांना अटक करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चाकऱ्यांनी केली आहे.

मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी सरकार विरोधकात जोरदार घोषणाबाजी केली. भर उन्हात हा मोर्चा निघाला शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.