गळा आवळून मित्राची हत्या; आरोपीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन

एकतर्फी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील जयसिंगपुरा येथे उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपीने स्वतः बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये हजर होत आत्मसमर्पण केले आहे.

अजय तिडके असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर मंगेश वायव्हळ असे आरोपीचे नाव आहे. अजयचा मित्र मंगेश वायव्हळ याला पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाल्यानंतर अटक केली आहे. अजय तिडके उर्फ गोल्या आणि आरोपी मंगेश वायव्हळ हे मित्र आणि दूरचे नातेवाईक होते. अजयचे त्यांच्याच नात्यामधील एका मुलीशी प्रेमप्रकरण होते. यासोबतच ती मुलगी आरोपी मंगेश याच्याशीसुद्धा बोलत असे. मंगेशचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. यामुळे अजय आणि त्या मुलीचे प्रेमप्रकरण त्याला मान्य नव्हते. यातूनच मंगेशने अजयला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपी मंगेश हा बुधवारी रात्री पुण्याहून औरंगाबादमध्ये दाखल झाला होता.

आरोपी मंगेश हा बुधवारी रात्री उशिरा अजयच्या रामेश्वर फ्लॅटवर गेला. फ्लॅटवर येताच मंगेशने अजयच्या फ्लॅटमध्ये असलेल्या सहकाऱ्यांना मला अजयशी काही खासगी बोलयाचे आहे, तुम्ही दुसऱ्या खोलीमध्ये जा, असे सांगितले. यानंतर आज पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान त्याने आधीच सोबत आणलेल्या पट्ट्याने अजयचा गळा आवळला. अजय मृत झाल्या झाल्यानंतरही मंगेश हा जवळपास २ तास अजयच्या मृतदेहाजवळ बसून होता. त्यानंतर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तो घटनास्थळावरून बाहेर पडला.

फ्लॅटमधून बाहेर पडताना आरोपी मंगेशला अजयचे रुममेट खोलीबाहेर अभ्यास करताना दिसले. त्यावेळी त्याने त्याच्या सहकाऱ्यांना ‘गोल्याचा केला गेम’ असे म्हणत बाहेर निघून गेला. यावेळी अजयच्या सहकाऱ्यांना तो गंमत करत असल्याचे वाटले. मात्र, काही वेळाने अजयची हत्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान , मंगेशने थेट बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व हकीकत सांगत आत्मसमर्पण केले.