गोव्याच्या अर्थसंकल्पाचे काम थेट रुग्णालयातूनच

गोवा विधानसभेत गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयातूनच अखेरचा हात फिरवत आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

गोव्याच्या अर्थखात्याची धुरा अद्याप पर्रिकरांकडेच आहे. पर्रिकरांच्या स्वादुपिंडाला सूज आल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. येथे बसूनच ते अर्थसंकल्पाची तयारी करत आहेत. त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण तयार आहे, केवळ प्रस्तावना बाकी आहे. अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्यासाठी ते सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दितयाचे टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सुदिन ढवळीकर गुरुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पर्रिकरांच्या अनुपस्थितीमुळे त्यांची विधानसभेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ढवळीकर हे गोवा सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री असून भाजपचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आहेत. ”विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भातील फायली तपासण्याची परवानगी मला देण्यात आलेली आहे. मात्र, पर्रिकर बुधवारी गोव्यात परतल्यास तेच अर्थसंकल्प सादर करतील,” असे ढवळीकर यांनी सांगितलं.