जागतिक आरोग्य दिनानिमित्त एक नैसर्गिक उपचारपद्धती

आज दिनांक ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन. या निमित्ताने प्रसिद्ध वैद्य अमित हिरवे (एम. डी. आयुर्वेद) यांच्याशी पोलीसनामाचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी संवाद साधून आयुर्वेद आणि उपचार या विषयी जाणून घेतले.
आरोग्य म्हणजे नक्की काय ?
आरोग्याची व्याख्या :
समदोष: समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मइन्द्रिय मन: स्वस्थ इति अभिधियते
म्हणजेच स्वस्थ कोणाला म्हणायचे “ज्याच्या शरिरातले दोष सम आहेत , अग्नी चांगल्या अवस्थेत आहे , सप्तधातू- रस,रक्त,मांस,मेद,अस्थी,मज्जा व शुक्र समतोल आहेत. आत्मा,मन, इंद्रिय सुद्धा प्रसन्न आहेत.” अशा व्यक्तीला आरोग्यसंपन्न म्हणायचे.
आयुर्वेदाचा उद्देश :
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य व्याधी परमोक्ष:
अर्थात् जो निरोगी आहे त्याचं आरोग्य टिकविणे आणि जो रोगी आहे त्याचं निराकरण करणे. आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी आचार-रसायन म्हणजेच दिनचर्या,ऋतुचर्या व्यवस्थीत पाळणे. योग्य अन्नसेवन, गुरुजन,आईवडील यांचा आदर करणे, खरं बोलणे. क्रोध, लोभ, मोह यांच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे.
पंचकर्म म्हणजे काय ?
आपण वापरत असलेली दुचाकी किंवा अन्य यंत्र याचं जसं वेळोवेळी सर्विसिंग करावं लागतं तसंच आपल्या शरिराचं आहे. निरोगी राहण्यासाठी जसे वरील आचार महत्वाचे तसेच पंचकर्म या उपचाराने शरिराचे सर्विसिंग करता येऊ शकते. पंचकर्म – वमन,विरेचन,बस्ती,नस्य,रक्तमोक्षण. किंवा उपकर्म – शिरोधारा,तैलधारा,पिंडस्वेद,मन्याबस्ती, ह्रदयबस्ती,कटीबस्ती,नेत्रतर्पण या कर्मांपैकी आपल्या शरिराला आवश्यक असणारी आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन जर (सर्विसिंग) पंचकर्म केली तर नक्कीच शरिर निरोगी राखण्यास मदत होईल.
सर्वांसाठी आजच्या दिवशी उपयुक्त असा सल्ला:
आज जागतिक आरोग्य दिन या निमित्ताने तर आहेच परंतू नेहमीच चांगल्या आरोग्य विषयक सवयींचे जसे आपण पाहिले आयुर्वेदाच्या उद्देशाप्रमाणे जर सर्वांनी दैनंदिन जीवनात प्रयत्न केला आणि त्यात जर योग्य असा व्यायाम केला तर नक्कीच सर्वजण निरोगी असे आयुष्य जगू शकतात. चला तर मग आज आपण सर्वजण तशी प्रतिज्ञा करूयात.