जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा एल्गार

अमरावतीः पोलिसनामा ऑनलाईन
जागतिक महिला दिनी शाळेसमोरील दारुचे दुकान बंद करण्यासाठी स्थानिक महिलांनी एल्गार पुकारणार आहे. अमरावतीमधील बडनेरा भागात हे दुकान असून मागील सहा महिन्यांपूर्वी दुकानसमोरच दुर्गावतार धारण करत महिलांनी देशी दारुच्या बाटल्या फोडून दुकानाला कुलूप देखील ठोकले होते. त्यावेळी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेल्या शपथपत्रानुसार दुकान अन्यत्र नेण्यास दुकानदार तयार नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा पवित्रा या तीनशे रणरागिणी महिलांनी घेतला.

या आंदोलनात शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या सुमारे ३०० महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. शहरातील अनेक कुटुंबे उदध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या बडनेरा जुनीवस्ती बारीपुरा भगतसिंग चौकातील देशी दारु या ठिकाणावरुन स्थलांतरीत करावे यासाठी मागील सुमारे ३० वर्षांपासून आंदोलन केले जात आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गांधी प्राथमिक शाळेसमोर दुकान असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांना मद्यपींच्या त्रासाचा सामना करावा लागतो आहे. येथून ये-जा करणाऱ्या महिलांच्या नाकी नऊ आले आहे. दारुडे रस्त्याच्या कडेला लघुशंका करीत असल्याने येथील रहिवाशांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशी दारुमुळे जुनीवस्ती भागातील असंख्य कुटुंबे उघड्यावर आल्याने महिलांच्या संयम सुटला आहे. मागील काही वर्षांपासून महिलांना निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.