डीएसके उभारणार क्राऊड फंडिंग मधून पैस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
अमेरिकेत एखादा उद्योजक आर्थिक संकटात सापडला असेल तर, तिथे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून त्या उद्योजकाला आर्थिक संकटातून बाहेर काढले जाते.आता माझ्यासाठी देखील डीएसके क्राऊड फंडिंग अंतर्गत पैसे गोळा केले जाणार आहे. नागरिकांनी अधिकधिक मदत करण्याचे आवाहन बांधकाम व्यवसायिक डीएसके उर्फ दिपक सखाराम कुलकर्णी यांनी आज पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. मी कोणाचेही पैसे बुडवणार नसून या यातून उभा राहणारा पैसा न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योजक मंदार जोगळेकर हे देखील उपस्थित होते.

डीएसके म्हणाले, मागील वर्षभरापासून आर्थिक अडचणीमध्ये सापडलो असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्याविषयी मी आधिक काही बोलू इच्छीत नाही. मंदार जोगळेकर यांनी नव्याने आणलेल्या कल्पनेच्या मध्यमातून माझ्यासह भविष्यात बांधकाम क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.अमेरिकेत क्राऊड फंडिंग हा उपक्रम राबविला जातो. त्यातून अडचणीत सापडलेल्या बांधकाम व्यवासायिकांना याचा फायदा झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातून अशाप्रकारच्या नवीन उपक्रमाला सुरुवात होणार असून या क्राऊड फंडिंगमध्ये १ हजार रुपयांपासून लाखो रुपये देऊ शकता. ती माझ्यासाठी मदत असणार आहे. त्यामुळे ते पैसे पुन्हा मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मागील चार दिवसापासून नागरिकांच्या अशा प्रकारच्या मदतीमधून आता पर्यंत ९ लाख रुपये जमा झाले असून मला नागरीक निश्चितच मदत करत आहेत आणि यापुढेही करत राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मी वयाने थकलो असेल. पण, या संकटाने थोडासा देखील ढासळलो नाही. पुन्हा नक्कीच उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत मला भीक नको तर, मदत करा असे भावनिक आवाहन केले आहे.
उद्योज मंदार जोगळेकर म्हणाले,  अमेरिकेत आर्थिक अडचणीत सापडलेल्या उदयोजकासाठी क्राऊड फंडिंग असा उपक्रम राबविला जातो. यातून अनेक उद्योजक बाहेर पडल्याचे पाहावयास मिळत असून आता डीएसकेसाठी देखील याच क्राऊड फंडिंग सेतूचा वापर केला जाईल. असे त्यांनी सांगितले. याला नागरिक अधिकधिक प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतीक कोळपे या विद्यार्थ्याने त्याच्या पॉकेट मनीमधून तब्ब्ल १८ हजार रुपये मदत केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तर माझ्या वयाचे अनेक तरुण मदत करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.