दिनविशेष : १२ मार्च जागतिक काचबिंदू दिन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अमित भिडे

संपूर्ण जगात ६.६ कोटी तर भारतात १.५ कोटी लोक काचबिंदू या आजाराने त्रस्त आहेत. आपल्या देशातील अंध लोकांमधील १३ टक्के लोकांना काचबिंदू मुळे अंधत्व आलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये या आजाराची माहीती देणे आणि प्रारंभिक अवस्थेत निदान करणे या हेतूने १२ ते १८ मार्च हा सप्ताह जागतिक काचबिंदू सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

काचबिंदू म्हणजे काय ?

डोळ्याच्या बाहूलीत काचेसारखी लकाकी दिसते. डोळ्यात निर्माण होणारे दोष व लक्षणे मिळून तशी स्थिती निर्माण करतात याला (ग्लाकोमा) काचबिंदू , कालामोनिया या नावांनी संबोधतात.

काचबिंदूची लक्षणे

धुरकट दृष्टी, प्रतिमेच्या कडेला अंधार दिसणे, समोर सरळ बघत असताना कडेचे काहीही न दिसणे, डोळा व डोके दुखणे, वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे ही सर्व काचबिंदूची प्रमुख लक्षणे आहेत.

कोणती काळजी घेतली पाहीजे ?

मधुमेहासारख्या आजारात काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते म्हणून मधुमेही तसेच ४० वर्षांवरील व्यक्ती आणि कुटुंबात कोणाला काचबिंदू असेल तर बाकीच्या सदस्यांनी डोळ्यांची तपासणी नियमित करून घेणे आवश्यक आहे. जीवनपद्धती बदल म्हणजेच झोप, व्यायाम,फळे, पालेभाज्यायुक्त आहार हे योग्य. धुम्रपान, दारू,तंबाखू आणि व्यसन यामुळे डोळ्याच्या शीरांना धोका असतो.

रक्तवाहिन्यातील चरबीमुळे रक्तपुरवठा असुरक्षित होऊन डोळ्यांवर अंतर्दाब वाढतो. औषधांमुळे जर हा अंतर्दाब कमी होऊ शकला नाही तर सुक्ष्म अंतर्गत मार्ग तयार करण्याची शस्त्रक्रिया करणे जरूरीचे असते. तरीही काचबिंदू होण्याचे हे एकच कारण नसल्याने ५ टक्के रूग्णांमध्ये अपयश येण्याची शक्यता असते.

पहिल्या टप्यातील आजार थांबविणे, मध्यम टप्यातील प्रगती थांबविणे आणि तीसऱ्या टप्यातील आजारामुळे येणारे अंधत्व थांबविता येणे शक्य आहे, त्यामुळे जागतिक काचबिंदू दिनानिमित्त आपण सर्व डोळ्यांची नियमित तपासणी व उपचार करून काचबिंदू टाळण्याचा निर्धार करुयात.