पोलिस भरती होण्यासाठी दोघांनी मिळून लढवली ‘अशी’ शक्कल

औरंगाबाद – पोलीसनामा ऑनलाईन 

औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा येथे सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. पोलीस होण्यासाठी पूर्ण कराव्या लागणाऱ्या स्पर्धा किंवा शारीरिक चाचण्याही सध्या सुरु आहेत. यातील धावण्याच्या स्पर्धेत एका उमेदवाराने नामी शक्कल लढवल्याची घटना समोर आली आहे. भरतीतील पाच किलोमीटर धावण्याची स्पर्धा दोन उमेदवारांनी प्रत्येकी अडीच किलोमीटर धावत पूर्ण केल्याचा प्रकार सातारा मधील भारत बटालियनमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये सशस्त्र पोलिस शिपाई पदासाठी भरती सुरू आहे. १७ मार्च रोजी उमेदवारांची पाच किलोमीटर अंतर धावण्याची स्पर्धा झाली होती. यात चेस्ट क्रमांक २८६५ चा उमेदवार अमोल लुकड वाणी याने ५ किलोमीटर अंतर स्वत: पूर्ण कापले नसल्याची माहिती मिळाल्यावरून त्याची चौकशी केली असता अमोलने स्वत: अडीच किलोमीटर अंतर पळाल्यानंतर त्याचे टोकन चेस्ट क्रमांक २८६३ चा उमेदवार रमेश शांताराम दांडगेला दिल्याचे उघड झाले आहे. यानंतर पुढचे अडीच किलोमीटरचे अंतर दांडगेने धावत स्पर्धा पूर्ण केली.

या महाठगांचा सर्व प्रताप व्हिडिओ शूटिंगमध्ये चित्रित झाला आहे. या दोघांना चौकशी समितीसमोर बोलावून विचारणा केली असता त्यांनीही या गैरप्रकाराची कबुली दिली. या प्रकरणी अमोल लुकड वाणी व रमेश शांताराम दांडगे (दोघेही रा. दहीगाव, ता. कन्नड) यांच्याविरुद्ध एसआरपीएफ कॅम्पचे सहायक समादेशकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागच्या वर्षी नाशिक येथे पोलीस भरती दरम्यान अशीच एक अजब घटना घडली होती. एका पोलीस पदाच्या उमेद्वाराने उंची वाढवण्यासाठी डोक्यावर केसाचा टोप घातल्याची घटना तेंव्हा घडली होती.