प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालये सुरु करणार – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

ADV

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

सव्वाशे कोटी जनता असलेल्या भारतात केवळ 6 टक्के नागरिक पासपोर्टधारक आहेत. ही संख्या वाढावी, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत 180 नवीन पासपोर्ट कार्यालय सुरु केले आहेत. नागरिकांना सुलभरित्या पासपोर्ट मिळावा आणि नागरिकांची लूट करणारे एजंट या प्रक्रियेपासून लांब रहावेत, यासाठी कडक नियम व अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पासपोर्टधारक व्हावे व देशाच्या विकासात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र अहमदनगर कार्यालयाचे उद्घाटन जनरल पोस्ट ऑफिस कार्यालयात खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. मुळे बोलत होते. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, महापौर सुरेखा कदम, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी (पुणे) अनंत ताकवाले, प्रोटोकॉल प्रभारी जतीन पोटे,वरिष्ठ पोस्ट मास्टर बाळासाहेब वाघ, प्रवर अधीक्षक जालिंदर भोसले, सुनील रामदासी, नगरसेवक सुवेंद्र गांधी आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. मुळे म्हणाले, नगरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे, यासाठी खासदार दिलीप गांधी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न करत होते. यासाठी त्यांचा विशेष पाठपुरावा होता. त्यामुळे दिल्लीकडून अहमदनगरला ही छोटीशी भेट म्हणून पासपोर्ट कार्यालय सुरु करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी खासदार गांधी म्हणाले, नगरमधून परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांना पासपोर्ट काढण्यासाठी या आधी पुण्याला ये-जा करावी लागत असे. आता नगर शहरात हे कार्यालय सुरु केल्याने शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळामध्ये व कमीतकमी कागदपत्रांमध्ये नागरिकांना पासपोर्ट उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा सर्वातजास्त पासपोर्ट धारक नागरिक असलेला जिल्हा व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.