बंद केलेल्या नोटा नष्ट करण्याचे काम सुरू : रिझर्व्ह बँक

पोलीसनामा ऑनलाईन

नवी दिल्ली
 : २०१६ साली बंद करण्यात आलेल्या ५०० व १००० च्या नोटांची मोजणी व छाननीचे काम झाले आहे. त्या नोटा नष्ट करण्याच्या प्रक्रियेपूर्वी फाडून टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली. ३० जून २०१७ पर्यंत जमा करण्यात आलेल्या जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची किंमत १५.२८ ट्रिलियन असल्याची माहिती बँकेने दिली होती.

अद्ययावत अशा चलन पडताळणी व प्रक्रिया प्रणालीद्वारे जुन्या ५०० व १००० च्या नोटांची मोजणी व प्रक्रिया झाली. विविध आरबीआय कार्यालयांमध्ये असलेल्या अद्ययावत प्रणालीच्या माध्यमातून नोटा फाडण्याचे काम सुरू असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने एका आरटीआय प्रश्नाच्या उत्तरात दिली.

एकदा फाटलेल्या नोटांचे गठ्ठे तयार झाले की एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे त्यांची विल्हेवाट लावण्यात येईल. आपण या नोटांची पुनर्निर्मिती करत नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. देशभरात रिझर्व्ह बँकेच्या विविध शाखांमध्ये एकूण ५९ चलन पडताळणी व प्रक्रिया यंत्र कार्यरत असून याद्वारे नोटांची मोजणी व छाननीचे काम चालते.