बालगंधर्व रंगमंदिर पाडतात म्हणे…..

डॉल्फिन भाऊ…

एक पुणेकर – का हो मी जे ऐकलंय ते खरं आहे का?

दुसरा पुणेकर- आता तुम्ही काय ऐकलं हे मला काय माहिती?

पहिला पुणेकर – तसं नाही हो..ते आपल्या बालगंधर्व नाट्यगृहाविषयी वाचलं. आणि काळजी वाटली. म्हणून विचारलं. ते पाडणार आहेत. अस कानावर आलं.

दुसरा पुणेकर – आता त्यात नवीन अस काय आहे? बालगंधर्व पहिलं तरी कुठे नीट उभं होतं. शासनाने आपली हौस म्हणून बांधल. पण त्याची काळजी काही घेतली नाही. तसं ते पडलेलं दिसतं.. पण ते पाडून नवीन काय करणार हे जे कुणी म्हणतात ना तोच एक मोठा विनोद आहे.

पहिला पुणेकर – तो कसा?

दुसरा पुणेकर- कारण ते बांधकाम पूर्ण झाल्यावर नवीन बालगंधर्व पाहायला आपण जिवंत नसणार
सध्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाविषयी बोलायचे झाल्यास वरील दोन पुणेकरांचा संवाद आपल्याला विचार करण्यास भाग पाडेल. यात शंका नाही.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय भाई अर्थात पु.ल.देशपांडे आता जेव्हा आभाळातून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराकडे बघत असतील तर त्यांना ढसढसा रडायला येत असेल. तीच गोष्ट महाराष्ट्रातील अनेक दिवंगत नाट्य,चित्रपट कलाकारांच्या बाबत म्हणता येईल. असा सूर कलाकार मंडळी, त्यांच्या संघटना, यांच्याकडून आळवण्यास आता सुरुवात झाली आहे.
नाट्यगृहांचे सुशोभिकरण, त्यांची देखभाल, डागडुजी करण्यात गैर काही नाही. मात्र आपल्याकडे हाती घेऊ ते तडीस नेऊ या उक्तीप्रती असलेली कमालीची अनास्था कुठलेही काम अर्धवट करून सोडून देण्याची वृत्ती वाढीस लागत आहे. याचीच कलाकारांसह सर्वसामान्य प्रेक्षकांना काळजी वाटल्याने त्यांनी पालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध करायला सुरुवात केली. आता पुणेकरांचा एखाद्या गोष्टीला त्यात सांस्कृतिक अस्मितेशी संबंधात असलेल्या गोष्टीविषयी असलेला विरोध हा किती प्रचंड असू शकतो हे बालगंधर्वची डागडुजी वर कळून येते. मुळात प्रेक्षकाना ते मोजत असलेल्या तिकिटाची रक्कम ही नाटकाच्या माध्यमातून वसूल करून हवी असते. मात्र त्यासाठी केवळ नाटक चांगलं असणे हा जरी एक भाग झाला तरी, दुसऱ्या बाजूला नाट्यगृहांची तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी लागते. म्हणजे नाट्यगृहांचे प्रसाधन गृह, खुर्च्या, वातानुकूलित सेवा, लाईट, साफसफाई, इतर स्वच्छता यामुळे प्रेक्षकांना त्या नाट्यगृहात कायम यावेसे वाटते. आता पुणेकर रसिकांना त्यांना पुण्यातील किती नाट्यगृहात जावेसे वाटते? हा प्रश्न विचारला तर यावर ते कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व यांची नावे ते पटकन सांगतील. अण्णाभाऊ साठे, पंडित भीमसेन जोशी कलामंदिर याचे नाव त्यांना थोड्या उशिराने आठवते. याचे कारण असे की, आपल्याकडे नाट्यगृह आणि त्याच्या देखभालीविषयीचा नकारात्मक दृष्टीकोन हा आहे.
बालगंधर्व पाडून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे रंगमंदिर तयार करणार अशा फुशारक्या पालिका मारत असली तरी जे बोलले ते प्रत्यक्षात यायला किमान 3 ते 4 वर्षांची वाट पाहावी लागेल. हे कलाकार आणि प्रेक्षक यांना माहिती आहेच. त्यामुळे दरम्यानच्या तीन ते चार वर्षात मनोरंजनासाठी त्यांना शहरातील इतर नाट्यगृहावर अवलंबून राहावे लागणार. यात अडचण अशी की, ही या नाट्यगृहांची स्थिती फार उत्तम आहे असे नाही. खिळखिळत्या अवस्थेतील ही रंगमंदिर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. हे सत्ताधारी लक्षात घेणार आहेत की नाही. संख्येच्या दृष्टीने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र हे सर्वात मोठे असून त्याची आसनक्षमता ही 3 हजार इतकी आहे. परंतु या रंगमंदिरात आवाजाची म्हणावी तितकी चांगली सुविधा उपलब्ध नसल्याची ओरड प्रेक्षकांकडून होत आहे. इतर नाट्यगृह मुख्य शहरापासून थोड्या दूरवर असल्याने तिथे प्रेक्षकांना पोहचण्यासाठी ट्रॅफिकचा थोडा त्रास सहन करावा लागतो. मात्र त्याला दुसरा पर्याय नाही. बालगंधर्व हे शहराच्या मध्यभागी व वेळेत पोहचण्यासाठी सुलभ असल्याने अनेक निर्माते,कलाकार या नाट्यगृहाला प्राधान्यक्रम देतात.

पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचे स्थान असलेल्या आणि अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची तोडमोड पाहवणारी नाही. भविष्यासाठी या वास्तूची देखभाल, दुरुस्ती गरजेची तर आहेच. मात्र ती करत असताना बदलत्या काळाचा विचार करावा लागेल. उगाचच नजीकच्या निवडणूकांची काळजी आपल्या शिरावर घेऊन धावणाऱ्या सत्ताधाऱ्यानी नागरिकांच्या सांस्कृतिक भावनांशी खेळण्यास सुरुवात केली आहे. अशीही कुजबुज आजूबाजूला ऐकायला मिळत आहे. झालं असं की, यामागची अनेक शासकीय बांधकामे वेळेअभावी, आणि अपुरा पैसा यामुळे अडकून बसली. याचा खोल परिणाम कलाकार व रसिक यांच्यावर झालेला दिसून येतो. त्यामुळेच की काय आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांधकाम होणार असल्याचे पालिका प्रशासन सांगत असताना देखील त्यांचे दात घशात घालण्याचे जोरदार प्रयत्न आपल्याला दिसू लागलेत.