मराठीच्या विकास, संवर्धनासाठी सदैव सकारात्मक प्रयत्न: मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी शासनाचे सदैव सकारात्मक प्रयत्न राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी भाषा विकास व संवर्धनाच्या दृष्टीने विविध धोरण व उपाय योजनांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस व मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विधानभवन येथे सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

बडोदे येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, मुंबई साहित्य संघाच्या अध्यक्षा उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस, तावडे यांच्याशी निवेदनातील मागण्यांच्या अनुषंगाने चर्चाही केली. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणीही उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळाने मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापना, मराठी भाषा विभागाची पुनर्रचना, तालुका तिथे सांस्कृतिक संकुल या मागण्यांबाबत मांडणी केली.