महात्मा बसवण्णा आणि लिंगायत आंदोलन

लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी नि कर्नाटक राज्य सरकारने या विषयीची केंद्र सरकारला केलेली शिफारस याची कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभर उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. वास्तविकपणे ही मागणी आजकालची नाही. या मागणीस सुमारे शतकभराचा इतिहास ओ. या अगोदर झालेले प्रयत्न हे विशिष्ट संस्था-संघटना यांच्यापुरते सिमित होते. गत आठ-नऊ महिन्यांच्या काळात या मागणीस जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्‍त झाल्याने एन निवडणुकीच्या तोंडावर कनार्टक राज्य सरकारने ही मागणी कायद्याच्या चौकटीत मान्य करून केंद्राच्या अंगणात चेंडू टाकल्याने केंद्रातील सत्तारुढ पक्ष कंगाल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर महात्मा बसवेश्‍वर जयंती निमित्ताने महात्मा बसवण्णांनी उभारलेल्या लिंगायत आंदोलनाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न.

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात वैदिक आणि अवैदिक या दोन प्रमुख परंपरा दिसून येतात. अवैदिक परंपरेत चार्वाक, बौद्ध, जैन, शिख आणि लिंगायत यांचा उल्‍लेख करावा लागतो. वैदिक परंपरेने या सर्वांना आपल्या कवेत घेण्याच्या प्रयत्न पुन्हा-पुन्हा केला आहे. तरीही या परंपरांनी आपले स्वतंत्र अस्तित्व जपलेले आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी तत्कालीन विषमतावादी व्यवस्थेच्या विरूद्ध बलाढ्य असे जन आंदोलन निर्माण केले. प्रस्थापित व्यवस्थेला छेद देण्यासाठी पर्यायी नवीन समाज व्यवस्था त्यांनी निर्माण केली. या व्यवस्थेने वेदप्रामाण्याएवजी अनुभावप्रामाण्य महत्त्वाचे मानले. दया हेच धर्माचे मूळ म्हणून सांगीतले. कायकची कैलास असा श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. ब्रह्म सत्य जगन्मिथ्य नाकारून जसे ब्रह्म सत्य, तसे जगतही सत्य आहे, हा सिद्धान्त मांडला. सदाचारिचि स्वर्ग, अनाचारचि नरक, मृदू वचनाची सकळ जप-जप असे सांगीतले. हा आमुचा हा आमुचा हा आमुचा असे सांगत बसवण्णांनी विश्‍वबंधुत्व जपले. अनुभव मंटपाची स्थापना करून लोकशाही संसदेचे प्रारूप जगाला दाखविले.
लोकभाषेत़ वचनांची निर्मिती करून सर्वांसाठी ज्ञानाचे द्वार खुले केले. चातुर्वर्ण्य नाकारून इष्टलिंग या समतासूत्राने समानता प्रस्थापित केली. यासंदर्भातील बसवण्णांचे एक वचन सुप्रसिद्ध आहे. ते म्हणतात.

दासीपुत्र असो, वेश्यापुत्र असो,
लिंगदीक्षा झाल्यावर साक्षात शिव मानून,
वंदून, पुजुन तयाचे पादोदक-प्रसाद
स्वीकार करणेच योग्य
असे न करता, तिरस्कार करणार्‍या
पंचमहापातक नरक पहा, हे कूडलसंगमदेवा

बसवण्णा इथेच थांबत नाहीत तर, सहपंक्ती भोजनाबरोबरच सहसंबंध जुळविण्याचा अट्टाहास धरतात. जातीयतेचे समूळ उच्चाटन करून वर्ण, वर्ग, जात, वंश आणि लिंग या सर्व भेदापासून मुक्त असा नवसमाज निर्माण करतात. तोच आजचा लिंगायत धर्म होय. कोणताही महापुरूष मी एक नवी धर्म स्थापन करीत आहे, तुम्ही माझ्या धर्माचे अनुयायी व्हा असे म्हणत नाही. तत्कालीन समाज व धर्म व्यवस्थेतील अनिष्ट रुढी-परंपरेला तिलांजली देऊन मानवी कल्याणाच्या सिद्धांताची नवी मांडणी करीत असतो. तो विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारा नवा समाज तो निर्माण करीत असतो. त्या सिद्धान्तांच्या उपयुक्ततेनुसार कालांतराने त्याचे रुपांतर धर्म या संकल्पनेत होते. या अर्थाने बसवण्णांच्या सिद्धातांशी एकरूप असणारा लिंगायत धर्म होय.
12 व्या शतकात बसवक्रांतीच्या प्रभावाने तत्कालीन अनेक शैव, सिध्द, नाथा परंपरेतील व्यक्ती बसवप्रणीत लिंगायत आंदोलनात सामील झाले होते. कल्याण प्रतिक्रांतीनंतर या लोकांनी पुन्हा आपले मूळ स्वरूप घेवून डोकेवर करू लागले. या संदर्भात महान संशोधक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी फार चिकित्सा केली आहे. ते असे म्हणतात, बिज्जळाच्या कालखंडात शरण चळवळीमध्ये शिरलेले नुकलीश पाशुपत, कापालिक व शुद्धशैव हे चतुःशैव विजयगरच्या प्रौढदेवरायच्या काळी आपला पुरोहितपणा जागृत करून लिंगायत धर्माचे वीरशैवीकरण करून लागले. याचकाळात आचार्य (चतुराचार्य-पंचाचार्य) निर्माण झाले. यांनी आपल्या धार्मिक ग्रंथांची गरज भागविण्यासाठी वचन सिद्धान्ताचा उपयोग करून सिद्धान्त शिखामणी सारखे संस्कृत शास्त्रग्रंथ तयार केले. डॉ. कलबुर्गी यांचा निष्कर्ष लक्षात घेत कानामागून आली अन तिखट झाली म्हंटल्याप्रमाणे लिंगायत धर्मात घुसखोरी केलेले वीरशैव हे आज आम्हीच या धर्माचे ठेकेदार असल्याची हुल उठवित आहेत. पण ते खरे नाही. कल्याण प्रतिक्रांती नंतर गत 900 वर्षांपासून अनेक स्थित्यंतर पचवित लिंगायत समाजाने आपली स्वतंत्र अस्मिता, स्वतंत्र ओळख जपली आहे. ही अस्मिता जपण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष सातत्याने करावा लागला आणि तो त्यांनी केला. तत्परिणामी ब्रिटिश काळात लिंगायताची स्वतंत्र ओळख जपली गेली होती.
इ.स. 1971 मध्ये ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी म्हणून दर दहा वर्षांनी जनगणना करण्यास सुरूवात केली. इ.स. 1871 मध्ये मद्रास प्रांतात झालेल्या जनगणनेत पहिल्या गटात हिंदू धर्मातील चार वर्ण अनुक्रमे अ,ब,क,ड, असे नोंदविले गेले असून इ विभागात जैन, बौद्ध आणि लिंगायत यांची स्वतंत्र नोंद झालेली आहे. इ.स. 1881 मधील जनगणनेत लिंगायत बेपत्ता दिसतात. तर इ. स. 1891 च्या जनगणनेत लिंगायतांना स्वतंत्र कोड मिळाले.
इ. स. 1906 मध्ये एंथोवेन यांच्या हिंदुस्थान धर्मकोश ग्रंथात लिंगायत हिंदुहून भिन्‍न असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर जिरगे बसवलिंगप्पा (1928), बरिस्टर एम. एस. सरदार (1940), डॉ. एम. आर. साखरे (1942), जे. बी. मल्‍लाराध्य आयएएस (1973), श्री. मगदुम (1981), डॉ. हिरेमल्‍लुरू ईश्‍वरन यांनी आपल्या लिखाण-भाषणातून हा विषय सातत्याने मांडत राहिले. अ. भा. वीरशैव महासभेने इ.स. 1940 पासून 2013 पर्यंत सातत्याने लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी केली. अलीकडील काळात डॉ. एन. जी. महादेवप्पा, डॉ. एम. एम. कलबुर्गी, डॉ. एस. एम. जामदार, रमजान दर्गा यांच्यासह अनेक विचारवंतांनी या विषयी लिखाण केले आहे. पुज्य माते महादेवी यांच्या नेतृत्वाखाली याच मागणीसाठी अनेकदा बेंगळुरू आणि दिल्‍ली येथे आंदोलने झाली आहेत. यानंतर गत आठ महिन्यांपासून या मागणीने जन आंदोलनाचे स्वरूप धारण करून बीदर, बेळगाव, कलबुर्गी, हुबळ्ळी, विजयपूर आणि बेंगळुरू या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लिंगायत मोर्चे निघाले. तेव्हा या मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने न्या. नागमोहनदास यांच्या अध्यक्षेखाली सात सदस्यांची समिती नेमून अहवाल मागविला. या समितीने दिलेला अहवाल स्वीकारून कर्नाटक राज्य सरकारने दि, 19 मार्च 2018 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत, लिंगायतांना स्वतंत्र धर्म मान्यता देण्यासंबंधी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय घेतला. हे या प्रदीर्घ लढ्याला मिळालेले पहिल्या टप्प्यातील यश होय. या यशाने देशभरातील लिंगायत समाज आनंदोत्सव साजरा करीत असताना देशाची (हिंदूंची) अखंडता धोक्यात आल्याची वल्गना करीत काही हिंदुत्ववादी संघटना, वीरशैववादी पंचाचार्य मंडळी हे विरोध करीत आहेत. ते साहजिक आहे. परंतु स्वतःच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी लढताना जर कोणाला ते देश-धर्माचे विभाजन वाटत असेल तर ती त्यांची स्वार्थी-संकोचीत मनोवृतीच म्हणता येईल, दुसरे काय ?

राजू ब. जुबरे
( सचिव, महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी, जि. बिदर )
मो. 8904638908