मेव्हण्याच्या लग्नाला अनुपस्थित , जावयाला चोप

अहमदाबाद : जावयाला दिला जाणारा मान इतर कोणत्याही नात्याला दिला जात नाही. सासुरवाडीची मंडळी देखील जावयाचे सर्व नखरे सहन करतात. हा जावई जेव्हा डोक्यावर बसू लागला तेव्हा मात्र त्याचे पाय जमिनीवर आणायला वेळ लागत नाही.अहमदाबादच्या बोटाडमध्ये एका जावयाला अशी वागणूक मिळाली. पत्नीसोबत मेव्हण्याच्या लग्नालाअनुपस्थित राहणे जावयाला चांगलंच महागात पडले. मेव्हण्याच्या लग्नाला न आल्याचा राग मनात धरून सासुरवाडीच्या मंडळींनी या जावयाची चांगलीच धुलाई केली असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदाबादच्या बोटाड येथे ही घटना घडली. पिनाकिन सोलंकी असे या जावयाचे नाव असून ते बँकेत कामाला आहेत. पिनाकिन यांचा मेव्हणा निलेशचा ५ फेब्रुवारीला विवाह होता. त्याच दिवशी पिनाकिन यांची ऑफिसात प्री-प्रमोशन प्रशिक्षण होते. त्यामुळे ते पत्नी निकितासह अहमदाबादला लग्नाला जाऊ शकले नव्हते.

शनिवारी १० फेब्रुवारी रोजी पिनाकिन त्यांची आई शारदाबेन यांच्यासोबत पत्नीला घेण्यासाठी सासुरवाडीला आले होते. पण पिनाकिन यांना दारात पाहताच सासुरवाडीच्या मंडळींनी शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासरा, मेव्हणा आणि मेव्हणीने त्यांना आणि त्यांची आई शारदाबेन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. निकितानेही सासू आणि नवऱ्याला चोप दिला. त्यामुळे जखमी झालेल्या पिनाकिन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी चंद्रखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक अंकुर पटेल यांनी सांगितले