मोहम्मद शमीवरील आरोपांवर काय म्हणाले बीसीसीआय

मुंबई : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत हसीन जहांने शमीच्या वैयक्तिक संभाषणाचे स्क्रीनशॉटही फेसबुकवर शेअर केले आहेत. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण प्रकरणी बीसीसीआय आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सने सध्या तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. परंतु या प्रकरणी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया
बीसीसआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,’ही त्यांची खासगी बाब आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही पडता कामा नये. सध्यातरी त्याच्याविरुद्ध कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्याच्यावर कोणतेही आरोप निश्चित करण्यात आलेले नाही. त्यांची अंतर्गत बाब आहे. पण याप्रकरणी जर पोलीस तक्रार नोंदवण्यात आली तर आम्ही देखील आमच्या नियमानुसार कारवाई करु.’

दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून प्रतिक्रिया देण्यास नकार
आयपीएलच्या अकराव्या मोसमात शमी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. पण आयपीएलच्या तोंडावरच हे प्रकरण समोर आल्याने शमीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही सध्या तरी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. (बुधवारी) सकाळी दिल्ली डेअरडेव्हिल्सची पत्रकार परिषद आहे. यावेळी ते याबाबत काही वक्तव्य करणार का? हे महत्त्वाचे ठरणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने तीन कोटीमध्ये शमीला खरेदी केले आहे.