लोकप्रिय मराठी अभिनेते विजय चव्हाण आणि धर्मेद्र यांना राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना तर चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना जाहीर झाला आहे. राजकपूर विशेष योगदान पुरस्कार दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना, तर चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी पुरस्काराची घोषणा केली.

५५ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या जीवनगौरव पुरस्काराचे पाच लाख रुपये, मानपत्र असे स्वरुप असून विशेष योगदान पुरस्काराचे तीन लाख रुपये, मानपत्र असे स्वरुप आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चित्रपती व्ही शांताराम पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्याम भूतकर तर राज कपूर पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या नाना पाटेकर, समीर (गीतकार), सुरेश ऑबेराय यांचे निवड समितीने पुरस्कारांची निवड केली होती.

मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षापासून आपले राज्य गाजविणाऱ्या विजय चव्हाण यांच्या चित्रपट, नाटकातील भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विजय चव्हाण यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या बॉलीवूड चित्रपटातून पदार्पण केले आणि अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्या नंतर विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. धर्मेंद्र यांना २०१२मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अस्सल मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘स्वामी’ या मालिकेतून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमी, मालिका आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.