विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नऊ हजार कोटी रुपयांची फसवणूक करुन देशाबाहेर पसार झालेल्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करा, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. फेरा कायदा उल्लंघन प्रकरणी मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालय (ईडी) ला कोर्टाने दिले आहेत.

मल्ल्यावरील कारवाईचा अहवाल येत्या 8 मेपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही ईडीला देण्यात आल्या आहेत. दिल्ली न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी दीपक शेरावत यांनी हे आदेश दिले. मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. या कामात बंगळुरु पोलिस ईडीला मदत करणार आहे.

उद्योगपती विजय मल्ल्याने 17 बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पलायन केलं. गेल्या वर्षी जून महिन्यात मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. त्याला भारतात आणण्याचे जोरदार प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहेत. मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. तर एप्रिलमध्ये भारताने विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला होता.