विठुरायाला चंदन उटी, चंदन उगाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्र

पंढरपूर : वृत्तसंस्था
वैशाख वणव्याची दाहकते सोबतच विठुरायाच्या परंपरागत चंदन उटी पूजेलाही सुरुवात झाली. यावर्षी प्रथमच मंदिर समितीने कर्मचाऱ्यांवरील चंदन उगाळण्याचा ताण कमी करण्यासाठी अद्ययावत यंत्र खरेदी केले आहे. त्यामुळे रोज दहा कर्मचाऱ्यांना आता सहाणेवर तासनतास चंदन उगाळावे लागणार नाही.

देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी 750 ग्राम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर घातले जाते. यापूर्वी हे चंदन उगाळण्यासाठी दहा कर्मचारी सलग चार महिने हे काम करत असत. मात्र आता मंदिर समिती हायटेक होत असून जळगावहून हे चंदन उगाळण्याचे यंत्र आणले आहे.

तीव्र उन्हाळ्याचा काळ आता पुढील तीन महिने तीव्र आहे. या उष्म्यापासून विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी चंदनाचा लेप त्याच्या सर्वांगाला लावण्यात येतो. लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचे चंदन मागविले जाते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदनयुतीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते.

विठुरायाच्या पोषाखावेळी आता रोज ही पूजा होणार असून मूर्तीला अंगरख्या ऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही या पद्धतीची चंदन उटी लावण्यास सुरुवात होते.