‘स्मोक फ्री व्हिलेज’ साठी प्रत्येक घरी उज्ज्वला गॅस कनेक्शन – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर :पोलीसनामा ऑनलाईन

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ‘स्मोक फ्री व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यात येत असून प्रत्येक कुटुंबांसाठी गॅस कनेक्शन या अंतर्गत जिल्ह्यातील 84 गावात दिनांक 20 एप्रिल हा दिवस ‘उज्ज्वला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ग्राहकांना नवीन गॅस देण्यासोबतच योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यात जिल्ह्यातील रामपुरी (सावनेर), खेडी गोवरगोंडी (नरखेड), धुरखेडा (उमरेड), सिहोरा (पारशिवनी) या गावांची ग्राम स्वराज्य अभियानासाठी निवड झाली असून या गावातील संपूर्ण कुटुंबांना गॅस कनेक्शन देऊन ‘स्मोक फ्री व्हिलेज’ करण्यात येणार आहे. वन विभागाने गावातील कुटुंबांना गॅस उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
हैद्राबाद हाऊस येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक 20 एप्रिल हा ‘उज्ज्वला दिवस’साजरा करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
‘स्मोक फ्री व्हिलेज’ साठी राज्यातील 192 गावांची निवड करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील चार गावांचा समावेश आहे. या गावातील कुटूंबांच्या याद्या तयार करून त्यांना गॅस कनेक्शन देण्याच्या सूचना करतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दिनांक, 20 एप्रिल हा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना दिवस म्हणून जिल्ह्यातील 84 गावांमध्ये विविध तेल कंपन्यातर्फे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधीनीं उपस्थित राहून उज्ज्वला गॅस योजनेची माहिती द्यावी,असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात तेल कंपन्यांकडून 37 हजार 500 गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. जिल्ह्यात 2 लाख 32 हजार कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येणार असून जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, नागपूर महानगरपालिका तसेच वन विभागाने दारिद्रय रेषेखालील कुटुंब तसेच इतर लाभार्थी कुटुंबाच्या याद्या तयार कराव्यात व त्यानुसार तेल कंपन्यांनी गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कारवाई तात्काळ सुरु करावी असे निर्देश देतांना गॅस कनेक्शन वितरणासंदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
उज्ज्वला दिनी गॅस कंपनीद्वारे जिल्ह्यात 84 स्थळी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असून याद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना सवलतीच्या दरात गॅस कनेक्शनचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय उज्ज्वला गॅस योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पंतप्रधान आवास योजना, एसआरए,आदिवासी भागातील नागरिक, दारिद्रय रेषेखालील नागरिक अशा विविध घटकातील ग्राहकांचा समावेश करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात ‘स्मोक फ्री व्हिलेज’ च्या माध्यमातून 2 लक्ष 32 हजार ग्राहकांना गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. दिनांक,20 एप्रिल रोजी 84 गावात राबविण्यात येणाऱ्या शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपले घर ‘स्मोक फ्री’ करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उज्ज्वला तेलमासरे यांनी केले.