Coronavirus : रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या 126 डॉक्टरांचाच कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. या रुग्णांना आरोग्यसेवा-सुविधा देण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न सुरु आहेत. पण आता या कोरोनाने डॉक्टरांनाच विळखा घातला आहे. यामध्ये आत्तापर्यंत तब्बल 126 डॉक्टर्सना प्राण गमवावे लागले.

देशात 24 तासांत कोरोनाचे 4,12,262 नवे रुग्ण आढळून आले होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,30,168 वर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या या काळात डॉक्टर्स आणि आरोग्य विभागातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र, कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे आत्तापर्यंत 126 डॉक्टरांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी 734 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे लसीकरण झाले होते का याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सुरु आहे.

सरकार तसे करत नाही…

केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या आरोग्य विभागाने कोरोना झालेल्या आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची स्थिती काय होती यासह माहिती नोंदवून ठेवणं आवश्यक आहे. दुर्दैवाने, सरकार तसे करत नाही म्हणून आयएमएही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले.