12th Class Exam : ‘कोरोना’ काळातच होणार 12 वी ची परीक्षा? केंद्र आणि राज्य सरकारांची संयुक्त बैठक, 19 विषयांची करण्यात आली निवड : सूत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाला मोठा फटका बसला आहे. रुग्ण संख्या कमी होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढत आहे. याच दरम्यान 12वी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना काळातच 12 वीच्या परीक्षा घेण्याची शक्यता आहे. यासाठी 19 विषयांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री, सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री आणि सचिव यांची आज (रविवार) उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वांनीच 12वीच्या परीक्षा घेणे अत्यंत गरजेचं असल्याचे मत मांडले. कारण यावरच विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे, असा प्रस्ताव मांडण्यात आला.

परीक्षा नाही घेतली तर कोणता मार्ग ?

केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त बैठकीत, 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्यात यावी, की नको ? जर घेयची नाही, तर कोणता मार्ग काढावा ? यावर बैठकीत चर्चा झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या बैठकीला, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोरखरियाल निशंक, केंद्रीय मंत्री स्मृती इरानी, प्रकाश जावडेकर तसेच सर्व राज्यांचे व केंद्र शासित प्रदेशांमधील शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, परीक्षेचे नियोजन करणाऱ्या बोर्डांचे अध्यक्ष आणि परिक्षेशी संबंधीत इतर संस्थांचे अध्यक्ष यावेळी सहभागी झाले होते.

सर्व पैलूंवर विचार करण्याची केंद्राची इच्छा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांमधील शिक्षण बोर्ड, सीबीएसई आणि आयसीसएईने 12 वीच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. याच बरोबर, एनटीएसह राष्ट्रीय परीक्षांचे आयोजन करणाऱ्या संस्थांनीही परीक्षा रद्द केल्या आहेत. तर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 30 मे रोजी परीक्षाबाबत पुढील नियोजनासंदर्भात सांगण्यात येईल, असे म्हटले होते. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी, सर्व पैलूंवर विचार करण्याची केंद्राची इच्छा आहे. याचा एक भाग म्हणून त्यांनी एक आठवड्यांपूर्वी राज्यांतील शिक्षा सचिवांसोबत बैठक घेतली होती.