ठाकरे सरकारपुढे मोठा पेच ! 12 वीच्या परीक्षेला पर्याय काय? विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10 वीची परीक्षा रद्द केली आहे. तर 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. बारावीच्या परीक्षा रद्द करणे शक्य नसल्याने त्या आता कधी आणि कोणत्या पद्धतीने घ्याव्यात यासंदर्भात राज्य सरकार समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. मात्र, परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील तब्बल 13 लाख 17 हजार 983 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिक्षणतज्ज्ञांकडून परीक्षेबाबत वेगवेगळे पर्याय सुचविले जात आहेत. विद्यार्थ्यांनीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने आणि कमी गुणांची परीक्षा घेऊन आम्हाला तणावातून दूर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले की, ऑफलाईन पर्याय स्वीकारला तर प्रश्नांची संख्या कमी करून परीक्षेची वेळ कमी करावी. परीक्षा टाळायचीच असेल तर विद्यार्थ्यांनी कृतिसंशोधन प्रकल्प सादर करावा व शिक्षकांनी त्यावर त्यांची ऑनलाईन तोंडी परीक्षा घ्यावी. दहावी आणि 11 वीच्या गुणांवर इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर करावा. तर माजी माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग, म्हणाले की, इयत्ता बारावीची परीक्षा घेणे आवश्यक आहे. ती कोणत्या पद्धतीने घ्यावी याचा विचार राज्य मंडळाने करावा. सर्व बाबींचा विचार करून बारावीची परीक्षा घेता येईल असे म्हटले आहे.

तसेच स. प. महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी ओम नवले याने म्हटले आहे की, कोरोनाची अशीच परिस्थिती राहिली तर शासनाने शिष्यवृत्तीसारखी एकच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करावा. तसेच ऑनलाईन परीक्षा घेतल्या तर सर्वच विषयांची परीक्षा देणे शक्य होईल. मात्र, ऑफलाईन काही निवडक विषयांची परीक्षा घ्यावी असे इश्वरी पाटील या विद्यार्थीनीने म्हटले आहे.