नवीन वर्षात 23 सुट्ट्यांची भेट, 8 महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त तर तीनदा अंगारकीचा योग, जाणून घ्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – नव वर्षात म्हणजेच 2021 मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांचा सुकाळ, गणेश भक्तांसाठी तीनदा अंगारकीचा योग आणि विवाहच्छुकांसाठी आठ महिने मुहूर्तच मुहूर्त अशी चंगळ असणार आहे. नवीन वर्षात 25 सुट्ट्यांपैकी 25 एप्रिल श्री महावीर जयंती आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दोनच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. यामुळे इतर दिनी चाकरमान्यांना 23 सुट्ट्या अनुभवता येणार आहे. एप्रिलमध्ये आलेल्या 5 पैकी 13 एप्रिल गुढीपाडवा आणि 14 एप्रिल डॉ. आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या जोडून आल्या आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

लग्नाळू आणि सोने खरेदी करणा-यांसाठी खुशखबर
विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी 2 मार्च, 27 जुलै आणि 23 नोव्हेंबर अशा तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेल्या आहेत. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 30 सप्टेंबर, 28 ऑक्टोबर आणि 25 नोव्हेंबर असे 5 गुरुपुष्य योग आले आहेत.

2021 हे नूतन वर्ष लीपवर्ष नसल्याने या वर्षात कामे करायला फक्त 365 दिवसच मिळणार आहेत. तसेच सरत्या 2020 वर्षात 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता लीप सेकंद मोजला जाणार नसल्याने नूतन वर्षारंभ रात्री ठीक 12 वाजताच होणार आहे. मात्र, पृथ्वीच्या गतीत होणाऱ्या बदलामुळे 2021 मध्ये 30 जूनला रात्री 12 वाजता लीप सेकंद मोजला जाण्याची शक्यता असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

नव्या वर्षात चार चंद्र-सूर्य-ग्रहणे
2021 या नवीन वर्षामध्ये आकाशात एकूण चार चंद्र-सूर्य-ग्रहणे होणार आहेत. परंतु, आपल्याकडे ईशान्य भारतातील एका ग्रहणाचा अपवाद वगळता एकही ग्रहण दिसणार नसल्याचे सोमण यांनी सांगितले.