40 वर्षांपूर्वी कोणीतरी गुटख्यापासून परावृत्त करायला हवे होते: शरद पवार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
तंबाखू आणि सुपारीचे सेवन केल्याचा पश्चाताप होत असल्याची भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोलून दाखवली. चाळीस वर्षांपूर्वी कोणीतरी या व्यसनापासून परावृत्त केले असते, तर बरे झाले असते,असे पवार म्हणाले.
मुंबईत इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 2022 पर्यंत तोंडाच्या कर्करोगाचे उच्चाटन करण्याचे आयडीएचे उद्दिष्ट आहे.
तंबाखू आणि सुपारीचं सेवन करत आल्याचा आपल्याला पश्चाताप होत आहे.चाळीस वर्षांपूर्वी ही सवय सोडण्यासाठी कोणीतरी दटावले असते, तर बरं झाले असते, अशी खंतही पवारांनी व्यक्त केली. शरद पवारांनी तोंडाच्या कर्करोगावर मात केली आहे.
शस्त्रक्रियेमुळे अत्यंत त्रास झाल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. दात काढल्यामुळे तोंड उघडण्यास त्रास होतो. त्याचप्रमाणे अन्न गिळताना आणि बोलतानाही दुखत असल्याचे शरद पवार म्हणाले. लाखो भारतीय अजूनही गुटख्याच्या आमिषाला बळी पडतात, हे पाहून त्रास होतो, असं सांगतानाच पवारांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. जागतिक मौखिक आरोग्य दिन 20 मार्च या दिवशी असतो. त्यानिमित्ताने आयडीएने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.