सावधान ! 5 दिवसात चिनी हॅकर्सकडून 40 हजारांवर सायबर हल्ले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असं सांगत महाराष्ट्र सायबर सेलने महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसात चीनमधून 40 हजारांहून जास्त वेळेस सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चीनकडून ‘गेल्या चार-पाच दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारचे किमान 40 हजार 300 सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनच्या चेंगदू भागातून सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न झाले’, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली. सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

चिनी हॅकर्स तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय इमेल किवा मेसेज पाठवू शकतात. विषयाचा मेल किंवा मेसेज पाठवून काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले जाऊ शकते असेल. संबंधित ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नये. सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँन्टी व्हायरस वापर करा , अशी सूचना महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आली आहे.