राज्यातील 495 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (API) बदलींवर फुली, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यभरात विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी (API) विनंती बदली (Transfer) करण्यासाठी अर्ज केले होते. आस्थापना विभागाचे विशेष महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी (Rajesh Pradhan) विविध बाबिंची पडताळणी केली. यामध्ये तब्बल 495 जणांनी केलेले विनंती अर्ज त्यांनी अमान्य केले आहेत. त्यामुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विहित कालावधी पूर्ण न झालेल्या नि:शस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रमुखांकडून शिफारशीसह विनंती अर्ज पोलीस आस्थापना मंडळासमोर 29 ऑक्टोबर 2010 रोजी सादर करण्यात आले होते. यावर अस्थापना मंडळ क्रमांक दोन यांनी सविस्तर चर्चा केली. अर्ज केलेल्या विनंती अर्जामध्ये प्रशासकीय बाबींचा उहापोह करण्यात आला होता.

ज्या घटकांमध्ये बदली करण्यात आली, तेथील रिक्तपदांची स्थिती, ज्या कारणास्तव बदलीची विनंती करण्यात आली, त्या कारणांचे गांभीर्य व तातडीची निकड, आतापर्यंत पूर्ण केलेला कार्यकाळ आदी बाबींचा विचार करुन विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अमान्य केल्या आहेत. या आदेशामुळे बदलीसाठी फिल्डिंग लावलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मोठा दणका बसल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

कोणत्या जिल्ह्यातून किती आले अर्ज ?

नवी मुंबई – 15, पुणे शहर -13, ठाणे शहर -27, सोलापूर- 4, नाशिक शहर – 16, औरंगाबाद शहर – 3, अमरावती शहर – 8, मुंबई लोहमार्ग – 20, रायगड – 1, सिंधुदुर्ग – 5, पालघर – 1, सातारा -4, सोलापूर ग्रामीण -1, कोल्हापूर- 2, नाशिक ग्रामीण – 4, धुळे -3, जळगाव -6, अहमदनगर -4, जालना -2, बीड -10, उस्मानाबाद -6, नांदेड -6, परभणी -1, लातूर -5, अमरावती ग्रामीण -13, अकोला -5, वाशीम -4, बुलडाणा -15, यवतमाळ -8, नागपूर ग्रामीण -8, वर्धा – 9, भंडारा – 8, चंद्रपूर-17, गोंदिया – 3, मुंबई शहर- 32 यांच्यासह इतर विभागात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले होते.