कोरोना नियमांचं उल्लंघन, 5 बार ठाणे महापालिकेने केले सील

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2 लेडीज बारसह एकूण 5 रेस्टॅारंट बारवर ठाणे महापालिकेच्या पथकाने सोमवारी (दि.22) रात्री धडक कारवाई करून सील केले. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील शिल्पा बार, सन सिटी लेडीज बार, टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो आदी 5 बारवर महापालिका पथकाने कारवाई केली आहे. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा लेडीज बार सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडू येथील सन सिटी या लेडीजबारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो आदी तीन बार सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले. दरम्यान, या पाचही आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व हॉटेल्संना एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के ग्राहकांना आत घेण्याची परवानगी दिलेली असतानाही सदर बारमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. याची माहिती मिळताच पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आणि कर्मचाऱ्यानी धाड टाकली असता दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त ग्राहक बसलेले आढळून आले. महापालिका उपायुक्तांनी तात्काळ कारवाई करत सदर हॉटेलला सील ठोकून कारवाई केली.