20 हजाराच्या दुचाकीसाठी भरले चक्क 7 लाख; शिरूर तालुक्यातील ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार

शिक्रापूर – ऑनलाईन खरेदी विक्रीची सध्या मोठी क्रेझ निर्माण झालेली असताना त्यातून मोठी फसवणूक होत आहे तर अनेक जण त्याला बळी पडत असताना ऑनलाइन फसवणुकीच्या असंख्य घटना घडत आहे त्यातच शिक्रापूर येथील दोघा युवकांनी वीस हजाराच्या दुचाकीसाठी ऑनलाइन पद्धतीने चक्क ७ लाख ४१ हजार रुपये भरले असून त्यांची फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील ईको ग्राम सोसायटीत राहणारे प्रणाल जगताप व ऋषिकेश जगताप या दोघा बांधवांना सेकंड दुचाकी घ्यायची असल्याने त्यांनी सेकंड वस्तू मिळणाऱ्या इंटरनेट वरील ओएलएक्स ॲप वर दुचाकी ची पाहणी केली त्यावेळी त्यांना एम एच १४ एफ वाय ९४३३ या क्रमांकाची ॲक्टिवा दुचाकी दिसली, दरम्यान प्रणाल जगताप व ऋषिकेश जगताप यांनी ती गाडी घेण्याबाबत रिक्वेस्ट सदर ॲप वर टाकली असताना शैलेश कुमार व अमित कुमार नावाच्या व्यक्तीने जगताप यांच्याशी फोनवर संपर्क साधला, त्यावेळी सदर दुचाकी वीस हजार रुपये मध्ये देण्याचे कबूल केले यावेळी ऋषिकेश जगताप याने शैलेश कुमार व अमित कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या बँक अकाउंट वर काही पैसे पाठवले परंतु सदर शैलेश कुमार व अमित कुमार नावाच्या व्यक्तींनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून २४ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ पर्यंत तब्बल ७ लाख ४० हजार ९९० रुपये जगताप यांच्या खात्यावरून ट्रान्सफर करून घेतले, मात्र त्यानंतर सदर व्यक्तींचे फोन देखील बंद झाले व त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे प्रणाल जगताप ऋषिकेश जगताप यांच्या लक्षात आले याबाबत प्रणाल सतीश जगताप वय २३ वर्षे रा. इको ग्राम सोसायटी, गुलमोहर बिल्डिंग शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. पणदरे ता. बारामती जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शैलेश कुमार व अमित कुमार ( पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.