धक्कादायक ! होमिओपॅथिक औषधाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, 5 जणांची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. अवघा देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असे असतानाच छत्तीसगडमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. होमिओपॅथिक औषधाचे सेवन केल्याने एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर औषध देणारा डॉक्टर फरार झाला आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टराच्या सल्ल्यानुसार एकाच कुटुंबातील सदस्यांनी ड्रोसेरा 30 (Drosera 30) हे होमिओपॅथिक औषध घेतले होते. ज्यात 91% अल्कोहोल होते. औषध घेतल्यानंतर सर्वांची प्रकृती अचानक बिघडली. सर्वांना रुग्णालयात दाखल केले असता त्यात 8 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.